दिघी (Dighi): भरधाव व निष्काळजीपणे कार चालवून ६१ वर्षीय ज्येष्ठ महिलेला धडक देत गंभीर जखमी केल्याप्रकरणी दिघी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ११ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दिघी येथील सई बाजार, साई पार्क कॉलनी परिसरात घडली.
Dighi नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी राहुल हेमंत तांदळे (वय ३७, रा. तांदळे हाईट्स, दिघी (Dighi)) यांच्या आई सौ. वंदना तांदळे (वय ६१) या ११ डिसेंबर रोजी सायंकाळी भाजीपाला आणण्यासाठी एकट्याच पायी जात होत्या. त्या सई बाजार येथील सार्वजनिक रस्त्यावरून चालत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव कारने (क्र. MH 12 WX 9826) त्यांना जोराची धडक दिली.
अपघात करून चालक फरार
आरोपी प्रविण नामदेव चव्हाण (वय ४५, रा. साई पार्क कॉलनी, दिघी (Dighi)) याने कार बेदरकारपणे व वाहतूक नियमांचे उल्लंघन करून चालवल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या अपघातात वंदना तांदळे यांच्या डाव्या पायाच्या खुब्याला फ्रॅक्चर होऊन त्या गंभीर जखमी झाल्या. मात्र, अपघातानंतर जखमी महिलेला मदत न करता आरोपी चालक घटनास्थळावरून कारसह फरार झाला.
पोलिसांची कारवाई
या प्रकरणी २४ डिसेंबर २०२५ रोजी दिघी (Dighi) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३२ (१) (क) व ११९/१७७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंगारे करत आहेत.







