Pune, २५ डिसेंबर २०२५ – ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) संलग्न ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन (AIBOMEF) द्वारे आयोजित नववे अखिल भारतीय अधिवेशन येत्या २७ व २८ डिसेंबर २०२५ रोजी पुण्यात पार पडणार आहे.
हे दोन दिवसीय अधिवेशन कॉ. सुरेश धोपेश्वरकर नगरी, दादासाहेब दरोडे सभागृह, बीएमसीसी जवळ, शिवाजीनगर, पुणे येथे होणार असून, देशभरातून ५०० हून अधिक बँक कर्मचारी सहभागासाठी येणार आहेत.
Pune अधिवेशनाचे उद्घाटन २७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता AIBEA चे सरचिटणीस कॉ. सी. एच. वेंकटचलम यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी निधू सक्सेना उपस्थित राहणार आहेत. याशिवाय बँक ऑफ इंडियाचे माजी महाव्यवस्थापक व्ही. सी. जोशी, बँक ऑफ महाराष्ट्र ऑफिसर्स असोसिएशनचे सरचिटणीस कॉ. कृष्णा बरुरकर, AIBEA चे उपाध्यक्ष कॉ. एन. शंकर व संयुक्त सरचिटणीस कॉ. ललिता जोशी ही विशेष पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात दुसरा “कॉ. सुरेश धोपेश्वरकर स्मृती पुरस्कार” प्रसिद्ध पद्मश्री विजेती सुचेता दलाल यांना देण्यात येईल. हा पुरस्कार त्यांच्या वित्त क्षेत्रातील योगदान आणि गुंतवणूकदार व बचतदारांसाठी केलेल्या जनजागृती कार्याबद्दल सन्मान म्हणून प्रदान केला जाणार आहे.
Pune; दुसऱ्या दिवशी अच्युत गोडबोले यांचे AI वर व्याख्यान
अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता प्रसिध्द आयटी तज्ज्ञ व लेखक अच्युत गोडबोले यांचे “कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि कामगार वर्ग: संधी, आव्हाने आणि पुढील वाटचाल” विषयावर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे.
AIBOMEF चे सरचिटणीस देविदास तुळजापूरकर यांच्या मते, या अधिवेशनात केंद्र सरकारच्या बैंक मर्जर व खाजगीकरणाविरुद्ध संघटनेचा विरोध, बँक ऑफ महाराष्ट्रच्या “लोकमंगल” मुख्यालयाचे बाणेरकडे स्थलांतर, METCO कंपनीच्या विक्रीविरोधी मुद्दे, तसेच बँक कर्मचाऱ्यांच्या भरती व मागण्यांवर चर्चा केली जाणार आहे.








