फुरसुंगी आणि उरुळी देवाची या दोन गावांमध्ये नगरपरिषद स्थापन झाली असली तरी बांधकाम परवानगी कोण देणार, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला होता. यासंदर्भात पुणे महापालिकेने राज्य शासनाकडे विचारणा केल्यानंतर नगरविकास विभागाने स्पष्ट आदेश दिला असून, या दोन्ही गावांच्या हद्दीतील बांधकाम परवानगीची संपूर्ण प्रक्रिया नगरपरिषदेनेच पार पाडावी, असे निर्देश दिले आहेत.
पुणे (Pune) : फुरसुंगी-उरुळी देवाचीबाबत महापालिकेला दिलासा; बांधकाम परवानगीचे अधिकार नगरपरिषदेवर
या निर्णयामुळे फुरसुंगी व उरुळी देवाची परिसरातील अधिकृत तसेच अनधिकृत बांधकामांवरील नियंत्रणाची जबाबदारी आता नगरपरिषदेवर आली असून, पुणे महापालिका या जबाबदारीतून मुक्त झाली आहे. त्यामुळे महापालिकेला मोठा दिलासा मिळाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने फुरसुंगी आणि उरुळी देवाची ही दोन गावे पुणे महापालिकेच्या हद्दीतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या गावांची स्वतंत्र नगरपरिषद स्थापन करण्यात आली. सध्या प्रशासकाच्या माध्यमातून येथील दैनंदिन कामकाज पाहिले जात आहे.
दरम्यान, नगरपरिषद स्तरावर तात्काळ पायाभूत सुविधा पुरवणे शक्य नसल्याने प्राथमिक स्वरूपाच्या काही जबाबदाऱ्या महापालिकेवर सोपवण्यात आल्या आहेत. तसेच विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली असून, या समितीने सहा महिन्यांच्या आत गावांच्या विकासाचा सविस्तर आराखडा राज्य शासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
गेल्या काही वर्षांपासून फुरसुंगी आणि उरुळी देवाची परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम प्रकल्प सुरू आहेत. यापूर्वी या प्रकल्पांना महापालिकेकडून परवानगी देण्यात आली होती. मात्र नगरपरिषद स्थापन झाल्यानंतर नव्या बांधकाम परवानग्या द्याव्यात की नाही, याबाबत संभ्रम वाढला होता.
या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी ऑक्टोबर महिन्यात नगरविकास विभागाला पत्र पाठवून मार्गदर्शन मागितले होते. त्यावर नुकतेच नगरविकास विभागाकडून पत्र प्राप्त झाले असून, बांधकाम परवानगीचे अधिकार नगरपरिषदेकडे हस्तांतरित करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.







