फुरसुंगी : हडपसर ते फुरसुंगी दरम्यान पीएमटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २१ मे रोजी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. गर्दीच्या बसमध्ये प्रवास करताना चोरट्यांनी हातचलाखी करत तब्बल १ तोळ्याचा दागिना चोरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत लतिका विकास केदारी (वय ४९, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारी या मागील ३० वर्षांपासून ससाणेनगर परिसरात वास्तव्यास असून, वर्धमान न्यू इंग्लिश स्कूल येथे शिपाई म्हणून कार्यरत आहेत. केदारी या आपल्या मुलगा शिवम याच्या घरी जाण्यासाठी हडपसर गाडीतळ येथून फुरसुंगीच्या दिशेने जाणाऱ्या पीएमटी बसमध्ये बसल्या होत्या.
प्रवासादरम्यान बसमध्ये मोठी गर्दी होती. साधारण ७:४५ वाजता त्या फुरसुंगी बसस्टॉपवर उतरल्या. मात्र, खाली उतरल्यावर त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी बसमध्ये तसेच परिसरात शोधाशोध केली, मात्र दागिना मिळून आला नाही. अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या गळ्यातील दोन वाट्या असलेले १० ग्रॅम (१ तोळा) वजनाचे सोन्याचे मिनी गंठण चोरून नेल्याची खात्री झाली. या चोरीस गेलेल्या दागिन्याची चालू बाजारभावाप्रमाणे सुमारे १ लाख ५० हजार रुपये किंमत आहे.
महिला प्रवाशांना सतर्कतेचे आवाहन.
पीएमटी बसमध्ये वाढत्या गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने, मोबाईल आणि पाकिटे चोरणाऱ्या टोळ्यांचा पुन्हा सुळसुळाट झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. विशेषतः सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत महिला प्रवाशांना लक्ष्य केले जात असल्याने प्रवाशांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात फुरसुंगी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, बसमधील सीसीटीव्ही आणि परिसरातील फुटेजच्या आधारे पोलिस पुढील तपास करत आहेत.
FursungiNews #PuneCrime #PMTBusTheft #GoldTheftPune #HadapsarToFursungi #PunePolice #फुरसुंगी #पुणेक्राईम #पीएमटीबसचोरी #फुरसुंगीपोलिस






