फुरसुंगी, पुणे | प्रतिनिधी : फुरसुंगी-वडकी (प्रजीमा) मुख्य रस्त्यावरील रेल्वे गेट क्रमांक 10 (Fursungi Railway Gate 10) येथे वारंवार होणारी वाहतूक कोंडी, अपघातांचा वाढता धोका आणि नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या ठिकाणी 100 फूट रुंदीचा रेल्वे अंडरपास (RUB) तातडीने उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
ही मागणी पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) तसेच केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
फुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषदेच्या वतीने भाजप गटनेते नगरसेविका सौ. अमृता धनंजय कामठे, भाजप नेते धनंजय आप्पा कामठे आणि मंगेश जाधव यांनी संयुक्तपणे ही मागणी केली आहे.
वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर
फुरसुंगी-वडकी हा परिसर वेगाने विकसित होत असून, औद्योगिक तसेच निवासी वसाहती मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. या मुख्य रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी व व्यावसायिक प्रवास करतात. मात्र रेल्वे गेट क्रमांक 10 वारंवार बंद होत असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात.
यामुळे शालेय विद्यार्थी, रुग्णवाहिका, तसेच अत्यावश्यक सेवांना अडथळा निर्माण होतो. स्थानिक नागरिकांनी यापूर्वीही अंडरपासची मागणी केली होती; परंतु अद्याप ठोस निर्णय झालेला नाही.
(Fursungi Railway Gate 10) 100 फूट रुंदीच्या अंडरपासची मागणी
स्थानिक प्रतिनिधींनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता केवळ अरुंद अंडरपास न करता किमान 100 फूट रुंदीचा अंडरपास (RUB) उभारण्यात यावा. यामुळे चारचाकी, दुचाकी तसेच जड वाहनांची वाहतूक सुरळीत होईल आणि वाहतूक कोंडी कायमची दूर होईल.
नगरसेविका सौ. अमृता कामठे यांनी सांगितले की, “नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. अंडरपास उभारल्यास परिसराच्या विकासाला चालना मिळेल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.”
लवकर निर्णयाची अपेक्षा
सदर मागणीवर रेल्वे प्रशासन व संबंधित विभागाने सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
फुरसुंगी-वडकी (Fursungi Railway Gate 10) परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा अंडरपास प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागल्यास वाहतूक समस्येचे कायमस्वरूपी समाधान होण्याची शक्यता आहे.
Fursungi Railway Gate 10, Fursungi Vadki RUB, Uruli Devachi Railway Crossing, Pune DRM News, Murliधर Mohol News, Pune Railway Underpass News, Fursungi Traffic Problem, Pune Local News Marathi








