🚨 फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेची कचरा निविदा रद्द!
पुणे | फुरसुंगी-उरुळी देवाची : फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या कचरा व्यवस्थापनासाठी काढण्यात आलेली कोट्यवधी रुपयांची निविदा अखेर रद्द करण्यात आली आहे. प्रत्यक्षात दररोज सुमारे 60 ते 70 टन कचरा जमा होत असताना तब्बल 132 टन कचरा गृहीत धरून निविदा काढण्यात आल्याने या प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. विरोध आणि आरोपांनंतर नगरपरिषदेने ‘तांत्रिक व प्रशासकीय त्रुटी’ असल्याचे कारण देत ही निविदा रद्द केल्याची माहिती समोर आली आहे.
60-70 टन कचरा, मग निविदेत 132 टन कसा?
फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषद हद्दीत सध्या दररोज साधारण 60 ते 70 टन कचरा गोळा होत असल्याचे सांगितले जाते. हा कचरा देवाची उरुळी येथील महापालिकेच्या प्रकल्पाकडे पाठविला जातो. सार्वजनिक स्वच्छता तसेच घरोघरी जाऊन कचरा संकलनाची व्यवस्था सध्या सुरू आहे.
मात्र नगरपरिषदेने सुमारे 2 लाख 40 हजार लोकसंख्या गृहीत धरून दररोज 132 टन कचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने निविदा काढल्याने मोठी चर्चा सुरू झाली. सार्वजनिक ठिकाणांची साफसफाई, घराघरातून कचरा संकलन आणि त्याची वाहतूक या कामांचा या निविदेत समावेश होता.
अतिरिक्त कचऱ्याच्या आकड्यावरून उपस्थित झाले प्रश्न
सध्याच्या कचरा संकलनाच्या आकडेवारीच्या तुलनेत निविदेतील कचऱ्याचे प्रमाण जवळपास दुप्पट असल्याचा आक्षेप घेण्यात आला. नगरपरिषदेचे कार्यकारी अधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या कार्यकाळात काढण्यात आलेल्या या निविदेत प्रत्यक्ष परिस्थितीपेक्षा सुमारे 52 टन अधिक कचरा दाखवण्यात आल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला.
या वाढीव प्रमाणामुळे तीन वर्षांच्या कालावधीत नगरपरिषदेवर कोट्यवधी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडू शकतो, असा दावा करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सुमारे 20 कोटी रुपयांच्या संभाव्य गैरव्यवहाराचे आरोपही करण्यात आले होते.
निविदेतील अटींवरही आक्षेप
केवळ कचऱ्याच्या प्रमाणावरच नव्हे, तर निविदेत नमूद करण्यात आलेल्या काही पात्रता अटींवरही प्रश्न उपस्थित झाले.
साधारण 130 ते 150 सफाई कर्मचाऱ्यांची आवश्यकता असू शकताना निविदाधारकाकडे 500 सफाई कर्मचारी पुरविण्याचा पूर्वानुभव असावा, अशी अट असल्याचा आक्षेप घेण्यात आला. तसेच कचरा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांबाबत घालण्यात आलेल्या विशिष्ट अटींमुळे स्पर्धा मर्यादित होऊन एखाद्या ठराविक ठेकेदाराला फायदा होऊ शकतो, असा आरोप करण्यात आला होता.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी उचलला होता आवाज
नगरपरिषदेचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक सचिन हरपळे, संतोष हरपळे यांच्यासह अजिंक्य ढमाळ, बाळासाहेब हरपळे आणि इतरांनी या निविदेतील कचऱ्याचे प्रमाण, खर्च आणि पात्रता अटींबाबत आक्षेप नोंदविल्याचे सांगण्यात आले.
त्यांनी निविदा प्रक्रियेची पारदर्शकता आणि प्रत्यक्ष गरज याबाबत प्रश्न उपस्थित करत फेरविचाराची मागणी केली होती.
अखेर निविदा रद्द
12 सप्टेंबर रोजी काढण्यात आलेली ही निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतर अखेर नगरपरिषदेने रद्द करण्याचा निर्णय घेतला. ‘तांत्रिक व प्रशासकीय त्रुटी’ हे निविदा रद्द करण्यामागील कारण सांगण्यात आले आहे.
निविदा रद्द झाल्यामुळे सध्या या प्रक्रियेला ब्रेक लागला असला तरी अनेक प्रश्न अद्याप कायम आहेत. प्रत्यक्ष कचरा 60 ते 70 टन असेल तर 132 टनांचा अंदाज नेमका कोणत्या आधारावर निश्चित करण्यात आला? 500 सफाई कर्मचाऱ्यांच्या अनुभवाची अट का आवश्यक होती? तसेच प्रस्तावित खर्चाची गणना कोणत्या आकडेवारीच्या आधारे करण्यात आली? याबाबत नगरपरिषद प्रशासनाकडून सविस्तर स्पष्टीकरण अपेक्षित आहे.
आता नव्या निविदेकडे लक्ष
जुन्या निविदेतील त्रुटी मान्य करून ती रद्द करण्यात आल्यानंतर आता नव्याने निविदा काढली जाणार का आणि काढल्यास त्यात कचऱ्याचे प्रत्यक्ष प्रमाण, मनुष्यबळ व खर्चाचे गणित कसे निश्चित केले जाणार, याकडे फुरसुंगी-उरुळी देवाची परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
टीप : या वृत्तातील गैरव्यवहार व ठराविक ठेकेदाराला फायदा करून देण्यासंदर्भातील उल्लेख हे संबंधितांनी केलेल्या आरोपांवर आधारित आहेत. संबंधित अधिकारी अथवा नगरपरिषद प्रशासनाची अधिकृत बाजू उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध केली जाईल.
Pune Bio-CNG Project: फुरसुंगी-उरुळी देवाची येथे 300 TPD प्रकल्प; BPCL ला 12 एकर जागा






