BJP पुणे : PMC महापालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असतानाच भाजपने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाला जोरदार धक्का दिला आहे. पक्षाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आणि संजय भोसले यांनी आज अधिकृतपणे (BJP) भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपच्या या अचानक खेळीमुळे महाविकास आघाडीतील जागावाटपाचे गणित बिघडल्याचे चित्र आहे.
या प्रवेशामुळे विशेषतः कोथरूड परिसरातील भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, तिकीट वाटपात बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
BJP चे १२५ जागांचे लक्ष्य
भाजपने आगामी महापालिका निवडणुकीत १२५ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ज्या प्रभागांत भाजप कमकुवत आहे, त्या ठिकाणी इतर पक्षांतील तुल्यबळ माजी नगरसेवक व उमेदवारांना पक्षात प्रवेश देऊन जागा जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे.
चार दिवसांपूर्वी भाजपने मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि काँग्रेस मधील माजी नगरसेवकांचा प्रवेश करून घेतल्यानंतर आता शिवसेना उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनाही गळाला लावले आहे.
BJP नेतृत्वाची उपस्थिती
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रभागनिहाय राजकीय परिणाम
पृथ्वीराज सुतार हे प्रभाग क्रमांक ३१ – मयूर कॉलनी, कोथरूड गावठाण येथून इच्छुक उमेदवार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे दुष्यंत मोहोळ व नवनाथ जाधव यांच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
संजय भोसले हे येरवडा–गांधीनगर, प्रभाग क्रमांक ६ मधून भाजपचे संभाव्य उमेदवार असतील. या प्रभागात भाजपची स्थिती नाजूक असल्याने भोसले यांच्या प्रवेशाचा पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.
संजय भोसले यांची भूमिका
संजय भोसले म्हणाले,
“महाविकास आघाडीमध्ये आम्ही काँग्रेससोबत प्रचार केला; मात्र आता प्रभागासाठी विनवण्या कराव्या लागत आहेत. हे आमच्यासाठी वेदनादायी आहे. आम्ही भाजपसोबत २५ वर्षे काम केले आहे. काँग्रेस महाविकास आघाडीचा धर्म पाळत नसल्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला.”
मुरलीधर मोहोळ यांचे वक्तव्य
मुरलीधर मोहोळ म्हणाले,
“तुम्ही अनेक वर्ष एका परिवारात काम केले आहे. आज तुम्ही पुन्हा आपल्या सख्या भावांकडे आले आहात. भाजपमध्ये तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली जाईल. उमेदवारीचा निर्णय पक्ष संघटनात्मक पातळीवर घेईल.”







