रात्री तीन वाजता मदतीचा फोन; Yunus Pathan क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयात धाव
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात गोरगरीब आणि गरजू रुग्णांसाठी आधारवड म्हणून ओळखले जाणारे कोविड योद्धा व सामाजिक कार्यकर्ता युनुस पठाण (Yunus Pathan) यांनी पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडवले आहे. १६ जानेवारी २०२४ रोजी मध्यरात्री तीन वाजता एका अनोळखी इसमाने जीवाच्या आकांताने मदतीसाठी केलेल्या फोनला त्यांनी तात्काळ प्रतिसाद देत त्या व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत दुःखद क्षणी आधार दिला.
दिवसभर रुग्णसेवेचे काम आटोपून घरी विश्रांती घेत असताना आलेल्या या फोनमध्ये, समोरच्या व्यक्तीने अश्रूंनी भरलेल्या आवाजात आपली व्यथा सांगितली. पत्नीच्या प्रसूतीदरम्यान तांत्रिक अडचणींमुळे नवजात बाळाचा मृत्यू झाला होता आणि कागदपत्रे, अंत्यविधी तसेच रुग्णालयाच्या प्रक्रियांबाबत तो पूर्णपणे हतबल झाला होता.
नवजात बाळाच्या अंत्यविधीसाठी स्वतः युनुस पठाण पुढाकार; स्मशानभूमीतही मदतीचा हात
क्षणाचाही विलंब न करता युनुस पठाण पहाटेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पोहोचले. त्यांनी पीडित इसम मिथुन बर्डे (रा. घारगाव, ता. संगमनेर) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संपूर्ण परिस्थिती समजून घेतली. यानंतर रुग्णालयाचे अधिष्ठाता राजेंद्र वाबळे यांच्याशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रे, प्रक्रिया आणि रुग्णालय बिलाबाबत मदतीसाठी पुढाकार घेतला.
रुग्णालयातील औपचारिकता पूर्ण केल्यानंतरही त्यांनी थांबण्याऐवजी स्वतः पुढाकार घेत पिंपरीतील लिंक रोड पत्रा शेड येथील स्मशानभूमीत प्रत्यक्ष जाऊन नवजात बाळाच्या अंत्यविधीसाठी मदत केली. अत्यल्प साधनांच्या साहाय्याने त्यांनी अंत्यविधीची व्यवस्था करून त्या कुटुंबाच्या दुःखात खऱ्या अर्थाने सहभागी होत माणुसकी जिवंत असल्याचे (Yunus Pathan) दाखवून दिले.
खाजगी रुग्णालयांच्या दमदाटीच्या पार्श्वभूमीवर माणुसकीचा आदर्श
आज अनेक ठिकाणी खाजगी रुग्णालयांकडून आर्थिक दमदाटी आणि सक्त वसुलीचे प्रकार समोर येत असताना, युनुस पठाण यांचे कार्य पिंपरी-चिंचवडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या शहरातही माणुसकी जिवंत असल्याचे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
या घटनेनंतर सोशल मीडिया, न्यूज पोर्टल्स आणि वृत्तपत्रांमधून युनुस पठाण यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, या कौतुकावर प्रतिक्रिया देताना त्यांनी नम्रपणे सांगितले की, “माझ्या कौतुकापेक्षा माणुसकी जिवंत ठेवा. कुणीही असो, एकमेकांना मदत करण्याची भावना वाढली पाहिजे.”
अविरत रुग्णसेवेचा ठसा; समाजासाठी प्रेरणादायी कार्य
युनुस पठाण (Yunus Pathan) यांनी आजवर रुग्णसेवेसाठी असंख्य पुरस्कार मिळवले असून, त्यांच्या कार्यामुळे अनेक गरजू रुग्णांना दिलासा मिळाला आहे. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांशी सौजन्यपूर्ण वागणूक, आर्थिक अडचणींमध्ये मदत आणि उपचार प्रक्रियेत मार्गदर्शन हे त्यांच्या सेवेचे वैशिष्ट्य आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात युनुस पठाण (Yunus Pathan) हे माणुसकीचे प्रतीक म्हणून ओळखले जात असून, त्यांच्या या कार्याची चर्चा सर्व स्तरांत होत आहे.








