Pune जिल्ह्यात तीन नवीन महानगरपालिका स्थापन केल्या जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केली. यामध्ये
- मांजरी, फुरसुंगी आणि उरुळी देवाची,
- चाकण,
- हिंजवडी
फुरसुंगी–उरुळी देवाची या भागांचा समावेश असेल
चाकण येथील औद्योगिक पट्ट्यातील वाढती वाहतूक कोंडी आणि नागरी समस्या पाहण्यासाठी घेतलेल्या पाहणी दौऱ्यात अजित पवार बोलत होते. त्यांनी सांगितले की, चाकण सध्या नगरपरिषद अंतर्गत असून त्यामुळे विकासावर मर्यादा येत आहेत, तर हिंजवडी भागात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या गंभीर होत आहे.
“कोणाला आवडो अथवा न आवडो, या भागांमध्ये महानगरपालिका स्थापन केल्या जातील,” असे ठाम मत अजित पवार यांनी व्यक्त केले.
चाकण औद्योगिक क्षेत्रात १,५०० हून अधिक लहान-मोठे उद्योग असून सुमारे ३.५ लाख कामगार येथे कार्यरत आहेत. दररोज एक लाखांहून अधिक वाहने या परिसरातून प्रवास करतात, त्यामुळे वाहतूक कोंडी मोठी समस्या बनली आहे. ही समस्या सोडवणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नवीन महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर पायाभूत सुविधा, वाहतूक व्यवस्थापन आणि नागरी सेवा अधिक प्रभावीपणे राबवता येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.








