लोणी काळभोर : पुणे शहरात अवैध धंद्यांविरोधात जोरदार कारवाई होत असल्याचे चित्र असताना, मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र मटका, अवैध दारू विक्री, गांजा आणि इतर बेकायदेशीर धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत चालल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. परिसरातील अनेक भागांत खुलेआम सुरू असलेल्या या अवैध व्यवसायांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मांजरी येथील ग्रामदैवत मंदिराच्या जवळच एक दारू विक्रेता अनेक वर्षांपासून अवैध हातभट्टी दारू खुलेआम विकत आहे. तर केशवनगर रोड परिसरात एका मटकाकिंगने थैमान घातल्याची चर्चा आहे, ज्याचे अवैध कृत्यांचे जाळे संपूर्ण भागात पसरले आहे. एका व्यक्तीने गांजा विक्रीत महारथ मिळवून मोठ्या प्रमाणावर पैसा कमावला असल्याची चर्चा रंगली आहे. काही ठिकाणी मटका व्यवसाय उघडपणे सुरू असून, अवैध दारू विक्री आणि गांज्याची तस्करीदेखील वाढली आहे.
या वाढत्या अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी व्यसनांच्या विळख्यात अडकत असल्याची तीव्र चिंता पालकांकडून व्यक्त केली जात आहे. परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे. “पोलीस नेमकं करतात तरी काय?”, “अवैध धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत?”, असे संप्तप्त सवाल आता नागरिक विचारू लागले आहेत. काही नागरिकांनी तर अवैध धंद्यांना स्थानिक पातळीवर संरक्षण मिळत असल्याचा आरोप करत, संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
मांजरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ठिकठिकाणी गुटखा आणि तंबाखू विक्री, तसेच काही भंगार व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद आर्थिक व्यवहार होत असल्याची चर्चा रंगली आहे. परिसरातील वाढत्या अवैध धंद्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालला असून, पोलिसांनी तातडीने धडक कारवाई करून या व्यवसायांना आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पुणे शहर पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही आता प्रश्न उपस्थित होत आहेत. अवैध धंद्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार कारवाईचा बडगा उगारणार का, की नेहमीप्रमाणे संबंधितांना पाठीशी घातले जाणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
मांजरीपोलिसठाणे #पुणेअवैधधंदे #मटकापुणे #गांजाविक्रीपुणे #हातभट्टीदारू #व्यसनमुक्तपुणे #लोणीकाळभोर #पुणेगुन्हेगारी #अमितेशकुमारपुणेपोलिस






