उरुळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपोवर नगरसेवकांचा हल्लाबोल! ‘ओपन डंपिंग’ विरोधात गाड्या अडवत तीव्र आंदोलन!

On: May 23, 2026 1:30 PM
Follow Us:
उरुळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपोवर नगरसेवकांचा हल्लाबोल! ‘ओपन डंपिंग’ विरोधात गाड्या अडवत तीव्र आंदोलन!

फुरसुंगी-उरुळी देवाची : फुरसुंगी-उरुळी देवाची येथील पुणे महापालिकेच्या कचरा डेपोवर सुरू असलेल्या ‘ओपन डंपिंग’विरोधात शुक्रवारी स्थानिक नगरसेवक आणि ग्रामस्थांनी आक्रमक आंदोलन छेडले. कचरा गाड्यांचा मार्ग रोखून धरल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि मनपा आयुक्त नवल किशोर राम यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

कचरा डेपो मुख्य घडामोडी आणि आंदोलन

कचरा गाड्या रोखल्या; परिसरात तणाव

फुरसुंगी येथील महापालिकेच्या कचरा डेपो परिसरात मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा टाकला जात असल्याचा आरोप करत फुरसुंगी नगरपरिषदेचे नगरसेवक, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सकाळी डेपोसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. आंदोलकांनी कचरा वाहून आणणाऱ्या गाड्या अडवत डेपोमध्ये प्रवेश रोखल्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

महापालिका अधिकाऱ्यांशी चर्चा

आंदोलनाची माहिती मिळताच पुणे महापालिकेचे उपायुक्त सुरेश वारुळे यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलकांशी चर्चा केली. महापालिका कोणतीही प्रक्रिया न करता थेट उघड्यावर कचरा टाकत असल्याचा आरोप यावेळी आंदोलनकर्त्यांनी केला. परिणामी परिसरात कचऱ्याचे प्रचंड ढीग साचले असून दुर्गंधी आणि प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

कचरा डेपो नागरिकांच्या आरोग्याशी खेळ आणि नियमांचे उल्लंघन

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सूचनांना केराची टोपली

प्रदूषण नियंत्रण मंडळाने उघड्यावर कचरा टाकू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या असतानाही महापालिकेकडून नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. “स्थानिक नागरिकांच्या जीवाशी खेळणारे ओपन डंपिंग तातडीने बंद झाले पाहिजे,” अशी मागणी करत आंदोलनकर्त्यांनी “ओपन डंपिंग बंद करा”, “नागरिकांच्या आरोग्याशी खेळ थांबवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

उपमुख्यमंत्री आणि आयुक्तांचा मध्यस्थीचा प्रयत्न

या आंदोलनामुळे पुणे शहरातील कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी आंदोलकांशी थेट दूरध्वनीवरून संवाद साधला. त्यांनी या समस्येवर लवकरच ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते मागे घेण्यात आले. नगरपरिषदेचे आरोग्य सभापती ॲड. अमोल कापरे, शीतल अमित हरपळे, संतोष हरपळे, सचिन हरपळे, स्नेहा हरपळे, भावना ढमाळ तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्ता राऊत आणि तात्या भाडळे यांनी आंदोलन स्थगित केल्याची माहिती दिली.

२० हजार टन कचरा उघड्यावर: ॲड. अमोल कापरे

“फुरसुंगी कचरा डेपोमध्ये तब्बल २० हजार टन कचरा उघड्यावर टाकण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारची प्रक्रिया होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. पुणे महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ नागरिकांची दिशाभूल करत आहेत. मात्र उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि आयुक्तांनी हा प्रश्न गांभीर्याने घेतल्यामुळे आम्ही आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.” ॲड. अमोल कापरे (आरोग्य सभापती)

उरुळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपोवर नगरसेवकांचा हल्लाबोल! ‘ओपन डंपिंग’ विरोधात गाड्या अडवत तीव्र आंदोलन!
उरुळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपोवर नगरसेवकांचा हल्लाबोल! ‘ओपन डंपिंग’ विरोधात गाड्या अडवत तीव्र आंदोलन!

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a Comment